अमेरिका दौरा विशेष

२००९
२०१२
२०१४
२०१६
२०१८

 

 

वेदांतभास्कर
सद् गुरू  प. पू. श्रीकृष्ण दत्तात्रय देशमुख  उपाख्य डॉ. काका

डोळे जसे तसे सृष्टी जशी तशी । तमाने झाकिता ती दिसावी कशी ।

सत्याचे दर्शन सूर्योदयी व्हावे । जीव ज्ञाने एक्या सौख्यपदा पावे ॥

सृष्टी, डोळे सारे काही यथास्थित पण अंधार पडला की सर्व व्यर्थ ठरते. दर्शन नाही. सूर्योदय झाला की सर्व स्पष्ट होते. ग्रंथ, वाक्य, वाचक, त्याची बुद्धी इ. प्राप्त असतानाही अर्थाचे आकलन, अर्थ सांगणारा भेटेपर्यंत होत नाही. अर्थातच अर्थावर प्रकाश पाडणारा हवा असतो. साध्या वाङ्मयाबद्दल हे जिथे सत्य आहे, तिथे वेदांतवाङ्मयाबद्दल विधान न करणेच बरे. वेदांतवाक्यांच्या अर्थाचे प्रकाशन श्रीगुरुंची वाणी करते. म्हणून ते वेदांतभास्कर होत. श्रीगुरू प. पू. डॉ. काका - मुरगुडचे - या ज्ञानभास्कराच्या आध्यात्मिक जीवन पैलूवर थोडा प्रकाश टाकण्याचा एक असफल प्रयत्न. सूर्यापुढे काडवाती लावून त्याला ओवाळण्यासारखे.

वर्तमान काळी व्याख्याते, प्रवचनकार आणि लेखक अनेक आहेत. मात्र चित्ताला समाधान देईल असा सुखद अर्थ -नेमका अर्थ - सांगणारे दुर्मिळच. महाराष्ट्रात मात्र परम सौभाग्याने पंचवीस वर्षांपासून एक वेदांत भास्कर तळपतो आहे. साधारणपणे वेदांती माणसे कठोर, अलिप्त, चिकित्सक, तार्किक, दुराग्रही वगैरे वगैरे असल्याने जरा तापदायक असतात असे म्हंटले तरी चालेल. पण हा अनुभव डॉ. काकांबाबत नक्कीच नाही. कारण डॉ. काका माउलींचा " मार्तंड जे तापहीन " प्रकारचा सूर्य आहे.

प. पू. डॉ. काकांच्या वाणीविषयी त्यांचा जगातील गौरव :
१. साच आणि मवाळ । मितले आणि रसाळ । शब्द जैसे कल्लोळ । अमृताचे ॥ डॉ. काकांची वाणी ( प्रवचने ) ऐकल्यावर कान निवतात, मन भरते, आशयगर्भ नेमके विवेचन ऐकल्यावर बौद्धिक समाधान लाभते, जीवाला आत्म्याची सोय सापडल्याने तो सुखावतो.
२. फारसा अभ्यास नसलेल्या श्रोत्यांना देखील "आम्हाला बरेच समजले" अशी अनुभुती येते.
३. त्यांचे प्रवचन सुरु झाल्यावर त्यांनी श्रोत्यांच्या हॄदयाचा ठाव केव्हा घेतला हे श्रोत्यालाही कळत नाही. याला म्हणतात हॄदयंगम भाषण.
४. अर्थवाही, ओघवती, प्रसन्न, सोपी, दमदार पण सुसंस्कृत, सत्य, परखड, अतीव आकर्षक, सुटसुटीत व ऐकतच रहावे अशी वाटणारी वाणी काकांचीच.
५. ती खोचक नसते, बोचक नसते, पारिभाषिक शब्दप्रयोगाने बोजड व क्लिष्ट झालेली नसते, अवाजवी प्रमाणात अलंकारिक नसते.
६. श्रोता-वक्ता याच्यातील अंतर कमी करणारी असल्याने श्रोत्यांना खिळवून ठेवते.
७. जेव्हा वक्त्याला प्रतिपाद्य विषयाचे प्रेम, श्रोत्यांविषयी जिव्हाळा, स्वत:बद्दल निरहंकारित्व आणि अर्थाची अनुभुती असतात, तेव्हा त्याच्या वाणीत प्रसादगुण ईश्वर कृपेने येतो व तिचा प्रभाव वरील प्रमाणे पडल्याशिवाय रहात नाही.
त्यांचे प्रत्येक प्रवचन चपखल दृष्टांत, रोचक गोष्टी, तर्कशुद्ध युक्त्या आणि क्वचित श्रोत्याला नकळत घेतलेला चिमटा यांनी मंडित असते. नुसते असे वर्णन ऐकणे पुरेसे नाही; प्रत्यक्ष प्रवचन ऐकणे हेच धन्यतेचे साधन आहे. आज पावेतो हजारो प्रवचने लाखो लोकांनी श्रवण केलेली आहेत. ती सर्व तत्त्वज्ञानपर असलेली प्रवचने ऐकल्याने ते श्रोते वेदांतशिक्षित वा वेदांतपारंगत आहेत हे सांगणे धाडसाचे होईल परंतु ते सर्व वेदांतसाक्षर आहेत हे निश्चित.

वाणी प्रमाणेच लेखणी देखील तितकीच पराक्रमी आहे. वेदांतपर विषय लिहिणे, खरे म्हणजे बोलण्यापेक्षा अवघड आहे. मात्र अश्या विषयांच्या लेखनात त्यांचा हातखंडा आहे. शास्त्रीय विषयाची न्यायघटीत मांडणी, शैलीदार प्रदर्शन, सुबोध व मार्मिक असे विपुल वाङ्मय त्यांनी आजवर निर्मिले आहे. लेखणीची करामत पाहाना - ब्रह्मसूत्रे - उपनिषदे येथपासून सुरवात करून स्तोत्रे, हरिपाठ करून ती मनाच्या श्लोका पर्यंत पोहोचली आहे. अद्वैत ग्रंथावर भाष्ये, टीका, भावार्थ, अनुवाद, केवळ शब्दार्थ, संपादन, स्फुट लेख-लेखन असा चौफेर समाचार तिने आजवर घेउन सरस्वतीचे भांडार समृद्ध केले आहे. त्यांच्या स्वतंत्र ग्रंथ लेखनातून मानवी जीवनाचे सर्व पैलू त्यांनी उजळले आहेत. अनुग्रह, अध्यात्म आणि जीवन, साधक सोपान, साधकबोध, पावा ही वानगीदखल नावे.

प्रस्थानत्रयीवरील त्यांचे भाष्यसदृश ग्रंथ मराठी सारस्वताचा अमोल ठेवा आहेत. पूर्वी प्रस्थानत्रयीवर भाष्यग्रंथ लिहिणाऱ्यास 'आचार्य' पदवी दिली जाई. मध्वाचार्य, वल्लभाचार्य, रामानुजाचार्य, निंबार्काचार्य, आद्य शंकराचार्य हे काही प्रख्यात आचार्य. त्यानंतर प्रस्थानत्रयीवर भाष्ये लिहिणारे आचार्य झालेले नाहीत. आज मात्र प्रस्थानत्रयीला मराठीत भाष्यकार लाभला तो प. पू. डॉ. काकांच्या रूपाने. ग्रंथ प्रत्यक्ष भाष्ये नाहीत. परंतु कालानुरूप गरजा लक्षात घेऊन निर्मिलेले भाष्यसदृश आहेतच. वर्तमानकालाचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा प्रस्थानत्रयीच्या भाष्यकार आचार्यांच्या उपरोक्त श्रेयनामावलीत आणखी एक नाव आदराने नोंदले जाईल - "डॉ. श्री. द. देशमुखाचार्य "

लिही तैसा वागे आणि बोले तैसा चाले असे ज्याचे वर्णन त्याची लोक वंदिती पाउले. काकांचे दर्शन असे आहे बघा - निष्कपट, प्रांजळ, प्रेमळ, दयाळू, अभेददृष्टी, अत्यंत साधे, सोज्ज्वळ, सदा अंतर्मुख, तृप्त, विलोभनीय. सदाचारसंपन्नता, धर्मशीलता, विहितकर्मां विषयी परम पूज्यभाव असणारे परंतु कर्म किंकरत्व व कर्मकठोरता नसणे, देशकालौ संकीर्त्य वागण्याचे सतत भान असणे आणि गृहस्थ जीवनाचा आदर्श असे हे आणखी काही पैलू जे सतत चमकून झळाळतात. पद्मपत्रमिवांभसा ही सर्कस ज्याला साधली असा हा दुर्मिळ महामानव.

गुरुपरंपरा वारकऱ्याची, मुखात सतत रामकृष्णहरी. त्यांचा संप्रदाय कोणता ? आम्ही काही वर्णन सांगतो, आपणच ठरवा. ऐका. गळ्यात तुळशीमाळ, मुखी रामकृष्णहरी, प्रवचने चालू असतात आत्मारामावर, लिहीत असतात दासबोध, जातात पंढरीला व सज्जनगडावर, आधार उद्धृत करतात शांकरवाङ्मयातून, दाखले देतात ज्ञानोबा तुकोबांच्या काव्यातील, संपादन करतात नाथभागवताचे, अर्थ सांगतात देवी, गणपती, गंगा, लक्ष्मी यांच्या स्तोत्रांचे व हे प्रकट काम आटोपले म्हणजे करतात सोऽहं ध्यान. आपण त्यांचा संप्रदाय निश्चित करा व आम्हालाही सांगा.

सांप्रदायिक दुरावा ठेवणाऱ्या भिंती त्यांनी कधीच दूर हटविल्या आहेत. अत्यंत समन्वयवादी व्यक्तिमत्त्व असून कोणत्याही पंथ, संप्रदायाबद्दल अनुदार वचन न बोलणारे आहे. कालाच्या उदरी फार मोठ्या कालांतराने असा गर्भ राहतो, पुढे होणाऱ्या अपत्याचे कालच संगोपन करतो आणि त्याला सक्षम करून जगदोद्धारासाठी जगात विचरण करण्यास लावतो.

त्यांची धर्मनिष्ठा, कर्तव्यनिष्ठा, बुद्धिनिष्ठा, विज्ञाननिष्ठा, ईश्वरनिष्ठा, शास्त्रनिष्ठा, ब्रह्मनिष्ठा आमचे ठिकाणी गुरुनिष्ठेचे बीज पेरोत ही कामना.

लौकिकात भरपूर लौकिक शिक्षण, व्यवहारात शासन व लोक यांची सन्माननीय मान्यता लाभलेली वैद्यक शास्त्रातील वृत्ती, भौतिक सुखसंपन्नता, भारदस्त व आकर्षक व्यक्तिमत्व काय कमी प्रतीचे ? अहो मधुराधिपतेरखिलं मधुरम्‌ ॥

हे सर्व असो. या श्रीगुरुंच्या प्रेमाचा विषय आहे अद्वैत वेदांत - शांकर वेदांताच्या रुपात. ओढ त्याचीच. ते म्हणत असतात माझे माहेर अद्वैत ! हे अद्वैत प्रत्यक्षपणे यत्र तत्र स्वानुभूत करण्याची महान क्षमता त्यांचे अंगी वसत आहे. त्यांचे जवळ सर्व आहे. आमचे जवळ एकच आहे, पंढरीनाथाजवळ प्रार्थना करणे, 'आकल्प आयुष्य व्हावे तया कुळा ।'

॥ हरि: ॐ तत्‌ सत्‌ ॥
-----------------------------------------------