- डॉ. श्री. द. देशमुख व्यक्ती व कार्य -

'जो जनांमध्ये वागे । परि जनावेगळी गोष्टी सांगे । ज्याचे अंतरीं ज्ञान जागे । तोचि साधू ॥' (दास. ६-१-१८) या वचनाची सत्यता ज्यांच्या रुपाने येते ते डॉ. श्रीकृष्ण दत्तात्रेय देशमुख उपाख्य डॉक्टरकाका. त्यांच्या रुपाने विद्यमान काळातही एका अत्यंत श्रेष्ठ जीवनमुक्त संताचे आपल्याला दर्शन होते. त्यांची व त्यांच्या कार्याची थोडक्यात माहिती देत आहोत.

आश्रमाने ते गृहस्थ, वागणुकीने वानप्रस्थी व वृत्तीने संन्यासी आहेत. श्रीसमर्थांनी सद्विद्यानिरुपणात उत्तम पुरुषाची लक्षणे दिली आहेत. ती लक्षणे त्यांच्या ठिकाणी प्रकर्षाने प्रगट झालेली आढळतात. उदा. "भाविक सात्विक प्रेमळ । शांती क्षमा दयाशीळ । लीन तत्पर केवळ । अमृतवचनी ॥" (दास. २-८-३). त्याच समासात समर्थांनी सहसा एकत्र न आढळणार्‍या गुणांच्या काही जोड्या दिल्या आहेत. पण आश्चर्य म्हणजे परमपूज्य डॉ. देशमुख यांच्यामध्ये ते गुण सुखाने एकत्र नांदतात. ते परमज्ञानी असून भक्त, महापंडित असून विरक्त, महातपस्वी असून अत्यंत शांत, उत्तम वक्ता असून मोठ्या मानधनामागे न लागणारे, सर्वज्ञ असून इतरांची मते ऐकणारे, अत्यंत श्रेष्ठ असून नम्र असे आहेत. अंतर्मुख, मितभाषी व परमार्थ हीच जीवननिष्ठा असलेले परमपूज्य श्रीगुरु डॉक्टरकाका " यदेव विद्यया करोति श्रद्धयोपनिषदा तदेव वीर्यवत्तरं भवतीति " छांदो. १.१.१०॥ अशा उपनिषदातील अध्यात्मसाधनेच्या वर्माच्या गोष्टी शिकवितात. त्यांची अधिक ओळख --

उंच, भव्य आणि अत्यंत प्रसन्न असे त्यांचे बाह्यदर्शन आहे. आत्मीयता, सौजन्य, कणव, अनाग्रह या गुणांनी त्यांचे अंतरंग नटलेले आहे. त्यांना पाहिल्यावर त्यांच्याकडे माणूस आकृष्ट होतो व सहवासात शांतीचा अनुभव घेतो. त्यांच्या रुपाने समर्थांना किंवा ज्ञानदेवांना अभिप्रेत असा सात्विक सत्पुरुष सर्वत्र वावरतो आहे. "चंद्रमे जे अलांच्छन । मार्तंड जे तापहीन । ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥" अशीच प्रार्थना ज्ञानदेवांनी का केली असावी याचे उत्तर डॉक्टरकाकांच्या सहजवर्तनाकडे पाहून मिळू शकते !

समाजप्रबोधनाची आवश्यकता ही आहेच. समाज किंवा व्यक्तीची सुधारणा व्हावी असे वाटत असेल तर समाज आणि व्यक्ती, दोघांच्याही चित्तशुद्धीकरिता त्या त्या पद्धतीने मार्गदर्शन करावे लागते. मग हळूहळू अवगुण टाकले जातात. उपरती होऊ शकते व लोक सन्मार्गी होतात. समाज लोकांचा बनला असल्याने समाजात परिवर्तन होते. परमार्थ क्षेत्रातही बद्ध मुमुक्षु होतात. मुमुक्षु साधक होतात, साधकांचे सिद्ध आणि सिद्धांचेही साधू-संत होतात. फक्त त्यांना अधिकारवाणीने प्रबोधन करणारे गुरु भेटले पाहिजेत व त्यांनी प्रेमाने मार्गदर्शन केले पाहिजे. शास्त्रशुद्ध अभ्यास करून जो स्वत: मुक्त झाला आहे व उपासकांना हाताशी धरून त्यांना मोक्षापर्यंत घेऊन जाण्याची कळकळ ज्याच्या अंतर्यामी आहे, अशा संताकडूनच हे सत्कार्य होत असते. सांप्रत अशा आदरणीय , वंदनीय सत्पुरुषांमध्ये डॉ. श्रीकृष्ण देशमुख यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल !

व्यवसायाने ते डॉक्टर आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात वेदगंगेच्या काठी असणार्‍या "मुरगुड" ह्या गावात त्यांनी अनेक वर्षे व्यवसाय केला. व्यवसायातील नैपुण्याबरोबरच अत्यंत दयाळू, अनासक्त, निरसल व एक देवमाणूस म्हणून ते पन्नास कि.मी. च्या परिसरात प्रख्यात होते. वैद्यकीय सेवा करतांना त्यांनी वेळ-काळाचे बंधन कधी पाळले नाही, तसेच कधीही रुग्णाला पहायला त्याच्या घरी जाणे नाकारले नाही. कोणत्याही वाहनाने अथवा चालतही रुग्णापर्यंत पोहोचणे हे आपले कर्तव्य मानले. पैशासाठी कधी कोणाला नाडले नाही. अनेक वेळा स्वतःच्या खिशातील पैसे गरीब रुग्णांना औषधे किंवा भोजन आणण्यासाठी त्यांनी दिले. "उत्तम गुण तितुके घ्यावे । घेवून जनास सिकवावे ।" या समर्थ उक्तीला त्यांनी आपल्या जीवनात प्रत्यक्ष उतरविले. त्यांच्या व्यावसायिक कार्याचा व कौशल्याचा, विशेषतः कुटुंबनियोजनाच्या कार्याचा महाराष्ट्र शासनाने पुरस्कार देऊन गौरव केला आहे.

व्यवसायाशिवाय गावात त्यांनी इतरही अनेक कामे केली. भूतबाधा, करणी इत्यादी बाबतीत समाजात असलेल्या चुकीच्या व घातक समजुती काढण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्यासाठी ओवाळून रस्त्यावर टाकलेल्या लिंबाचे सरबत करून पिणे, मिरच्यांवर मुद्दाम पाय देऊन जाणे अशा गोष्टीही करून दाखविल्या. "अशा वस्तुंच्या स्पर्शानेही बाधा होते" या दृढ समजुतीला त्यांच्या अशा प्रत्यक्ष कृतीने परस्पर उत्तर दिले गेले. आपल्या संस्कृतीचे जतन करीत, योग्य अशा आधुनिकतेचाही स्वीकार ते करतात. पारमार्थिक सेवा म्हणून व सामाजिक गरज ओळखून गावात विठ्ठल मंदिर बांधण्यात त्यांनी पुढाकार घेतला. मुरगुडमध्ये बालवाडी नव्हती. संस्कार शिक्षणाचे महत्व ओळखून आपल्या आणखी दोन समविचारी सहकार्‍यांच्या मदतीने त्यांनी तीन बालवाड्या काढल्या. गरीब विद्यार्थ्यांना त्यांची जातपात न बघता शिक्षणाला मदत केली, एका मुलाला डॉक्टर होईपर्यंत शिक्षण दिले.

अशा कनवाळू स्वभावामुळे "एक देवमाणूस, एक संत" म्हणून त्यांना जनमानसात अढळ स्थान मिळाले. त्यांच्या पत्नी सौ. वसुंधरा देशमुखही (काकू)तशाच उत्साही, हसतमुख व उदार स्वभावाच्या आहेत. थोर व्यक्तीची सहचारिणी होणे सोपे नसते. सौ. काकूंनी ती आघाडी अत्यंत समर्थपणे व आनंदाने सांभाळली आहे.

निरपेक्षपणे करीत असलेल्या व्यावसायिक व सामाजिक सेवेबरोबरच परमपूज्य डॉ. देशमुखांनी पारमार्थिक ग्रंथांचे वाचन, चिंतन, मनन हे नित्यनेमाने सुरू ठेवले होते. व्यवसायाचा फार मोठा व्याप असल्याने अभ्यासाला वेळ मिळावा म्हणून त्यांनी त्या काळात झोपेची व विश्रांतीची वेळ कमी केली. या कर्मयोगामुळे आणि अखंड अभ्यास व चिंतनामुळे उपनिषदांतील ज्ञानगंगा त्यांच्या माध्यमातूंन मराठीत ओवीरुपाने प्रकट झाली. व्यवसायकालातच दशोपनिषदांवर ओवीबद्ध टिका तसेच परमार्थविषयक अनेक लेखही त्यांनी लिहीले. याच काळात सुरवातीला आसपासच्या तीन तालुक्यात प्रवचन सेवा केली व पुढे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी ते जाऊ लागले.
सन १९७५ च्या सुमारास ईशावास्योपनिषदावरील टिकेला प्रस्तावना मागण्याच्या निमित्ताने डॉ. देशमुखांची वारकरी संप्रदायाचे अध्वर्यु परमपूज्य श्रीशंकरमहाराज खंदारकर यांच्याशी भेट झाली व अनुग्रहाचाही लाभ झाला. पुढे सन १९८१ मध्ये डॉक्टर देशमुखांना संप्रदाय वाढविण्याची-अनुग्रह देण्याची आज्ञा झाली. मात्र प्रत्यक्ष अनुग्रह ते सन १९८७-१९८८ च्या सुमारास देऊ लागले. वारकरी संप्रदाय स्वीकारल्यामुळे संप्रदायाच्या पद्धतीप्रमाणे "माळ घालणे" यासाठी त्यांच्याकडे अनेक लोक येत राहिले. माळ घातल्यावर किमान दारू व सामिष भोजन तरी सुटेल या विचाराने त्यांनी अनधिकारी जनसामान्यांनाही माळ घालण्याचे काम केले. अधिकारी व्यक्तीला अनुग्रह मिळू लागला. ते श्रीगुरूपदावर आरूढ झाले.

वयाच्या बावन्नाव्या वर्षी सर्व कौटुंबिक जबाबदार्‍या उत्तम रितीने पूर्ण केल्यावर त्यांनी ऐहिक उन्नतीचा स्त्रोत असलेल्या व्यवसायांतून निवृत्ती स्विकारली व पुढील सर्व आयुष्य समाजप्रबोधन या ईश्वरी कार्याला दिले. प्राप्त झालेले ज्ञानामृत लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम ते आता प्रवचन तसेच लिखाणाच्या माध्यमांतून करीत असतात. श्रीमत्‌ आद्य शंकराचार्यांनी सांगितलेले, शुद्ध परमार्थाचे स्वरूप सांगणारे वेदांत तत्वज्ञान, आजच्या भाषेत लोकांपर्यंत पोहोचविण्याचे त्यांचे काम आजही अव्याहतपणे सुरू आहे.
"शाहाणे करावें जन । पतित करावे पावन । सृष्टीमधें भगवद्‌भजन । वाढवावें ॥ (दास.१४-६-३३)" हा समर्थांचा आदेश ते पाळत आहेत. त्यांची प्रवचने शास्त्रशुद्ध, तर्कशुद्ध व त्याचबरोबर भक्तिपोषक, श्रद्धायुक्त अशी असतात. गाढा व्यासंग, चिंतन व मनन यांतून प्रगट झालेले, सूक्ष्मातिसूक्ष्म सिद्धांतांचे साधकासाठी त्यांनी लावलेले सुसंगत अर्थ, त्यांच्याच तोंडून ऐकणे ही एक पर्वणीच असते. त्यांची वाणी प्रौढ, गंभीर, प्रासादिक अशी आहे. प्रसन्नता आणि स्पष्टवक्तेपणा अशा गुणांनी ती समृद्ध आहे. जात, धर्म, पंथ, संप्रदाय यांच्या संकुचितपणाला त्यांनी कधीही थारा दिलेला नाही. संतवाङमयाला वेदान्ताची परिपूर्ण बैठक कशी आहे व त्यासाठी संत वाङमयाचा अभ्यास कसा करावा हे ते स्पष्ट करतात. लोकांच्या मनातील अध्यात्म व परमार्थ या दोन शब्दांविषयी असलेले गैरसमज काढून शुद्ध परमार्थाचे स्वरूप ते सांगत असतात. भक्ती, कर्म, ज्ञान, ध्यान यांनी युक्त उपासना कशी साधावी याचे वर्म ते सांगतात. "शुद्ध विवेके परमेश्वर ओळखावा" ते त्यांचे मुख्य सूत्र ते कधी सोडत नाहीत. यासाठी मराठीप्रमाणेच ते हिंदी व इंग्रजी भाषेतही प्रबोधन करतात.

प्रबोधनकार्यासाठी त्यांनी भारतभर तीर्थयात्रा केल्या व परदेशातही दौरे केले. देशांत व परदेशांत १० ते १२ हजारांवर त्यांची प्रवचने झाली आहेत. त्यांनी स्वतः त्याची कधी मोजदाद केली नाही किंवा ते त्याबद्दल बोलतही नाहीत. साधकांसाठी शिवथरघळ, सज्जनगड, पंढरपूर यासरख्या क्षेत्रात ते प्रवचने व अभ्यासवर्गांतून मार्गदर्शन करतात. अशा अनेक क्षेत्रस्थलांप्रमाणेच शैक्षणिक संस्था, गावोगावची देवळे व इतरत्रही त्यांची प्रवचने सातत्याने सुरू असतात. अनेकांच्या सहकार्याने सत्संग मेळावे, शिबिरे, अभ्यासवर्ग ते सातत्याने घेतात. साधकमंडळी एखादा अद्वैतपर ग्रंथ निवडून ५-६ दिवसांचा निवासी अभ्यासवर्ग आयोजित करतात. त्यांत परमपूज्य डॉक्टरकाका व परमपूज्य मंदाताई गंधे (अमरावती)यांचे मार्गदर्शन असते. तरूणांसाठी विशेष अभ्यासवर्गही आयोजित केले जातात. या सगळ्यांतून अनेक मोक्षार्थी साधक त्यांच्याकडे आकृष्ट झाले. सुजाण, ज्ञानी भक्तांची मांदियाळी तयार करण्याचे कार्य ते अथक परिश्रमाने करीत आहेत. सुरूवातीला मोजकेच साधक असलेला छोटासा वेल आता गगनावरी जाऊ पाहात आहे. हजारो साधकांचा परिवार आज त्यांच्याभोवती आहे. त्यांतूनच आज अनेक प्रवचनकार, लेखक, अभ्यासक साधक तयार झाले आहेत.

परमपूज्य डॉक्टरकाकांनी निष्काम कर्म, भक्ती, ज्ञान, वैराग्य हे स्वतः आचरून लोकांना ते समजावले. कसे आचरणात आणावे हे शिकवले. मोक्ष म्हणजे मृत्युनंतर मिळवावयची उधारीतील गोष्ट नसून यांच जन्मांत भोगण्याचा अखंड आनंदाचा सोहळा आहे, मुक्तीचा खरा आनंद "आनंदाने जगणे व वेळ आल्यावर आनंदाने देह व जग सोडून देणे" असा आहे व त्या आनंदाच्या, तृप्तीच्या, समाधानाच्या प्राप्तीसाठी नक्की काय करावयाचे हे त्यांच्या शिकवणीतून कळते. साधना म्हणजे दिवसांतून काही ठराविक वेळ करावयाची गोष्ट नसून ती पूर्ण जीवनपद्धती आहे हे सूत्र ते आग्रहाने मांडतात. संसारातच राहून आहे त्या परिस्थितीत, आहे त्या माणसांत मुक्ती कशी साधता येईल, तसेच "विचार आणि विवेक हे परमार्थाचे खरे साधन आहे", "कृतिशीलता हळूहळू कमी झाली पाहिजे म्हणजे रजोगुण कमी करून सत्वगुण वाढवला पाहिजे, कारण सत्वगुण हे साधनांचे साधन आहे" इत्यादी प्रकारांनी ते जीवनपद्धती सांगतात, साधकांना प्रोत्साहन देतात. साधनेच्या अनेक व्याख्या त्यांच्या मुखातून येतात. उदा. "अंत:करणाच्या विशेषणाची उपाधी करणे या प्रक्रियेला साधना म्हणतात", "जीवनापासून परमार्थ दूर न ठेवता तो जीवनात प्रत्यक्ष उतरविण्याची अखंड धडपड, याचे नाव साधना", "परमार्थाला आड येणार्‍या विषयांपासून मनाला आवरणे म्हणजे साधना" इत्यादी. प्रत्येक साधकाच्या अधिकारानुसार तो आहे त्याहून पुढे कसा जाईल हा त्यांचा विचार असतो. प्रत्येकाच्या तळमळीनुसार त्यांचे त्या त्या जीवाकडे लक्ष असते. त्याला परमार्थ मार्गात पुढे नेताना स्वत:ला होत असलेले कष्ट, वेळ, पैसा इ. गोष्टींची त्यांनी कधीच पर्वा केलेली नाही. कुठेही जातांना विशिष्ट वाहनाचा आग्रह त्यांनी कधीही धरला नाही. त्यांच्या लेखी चालणे, रिक्षा, स्कूटर किंवा मोटारकार, विमान सगळे सारखेच आहेत. दासबोध, ज्ञानेश्वरी, विवेकसिंधू, उपनिषदे, ब्रह्मसूत्रे, गीता यांसारख्या ग्रंथांचे ते अधिकारी भाष्यकार आहेत. "जेणें परमार्थ वाढे । अंगीं अनुताप चढे । भक्तीसाधन आवडे । त्या नांव ग्रंथ ॥" (दास. ७-९-३०) अशी उत्तम ग्रंथाची कसोटी समर्थांनी सांगितलेली आहे. डॉ. देशमुखांचे समग्र लेखनच या कसोटीला उतरते. शुद्ध अध्यात्म वाढावे, मूळ सिद्धांत व विमळ ज्ञान समजावून द्यावे, या प्रेरणेतून ते झालेले आहे.

कोणत्याही ग्रंथाचा "डोळसपणे अभ्यास" कसा करावा हे डॉक्टरकाका साधकांना सांगतात, युक्तीप्रयुक्तीने त्यांना ज्ञानसंपन्न बनवतात. ज्याचा त्याचा अधिकार पारखून त्यांच्यावर कामे सोपवतात. स्वतः लोकसंग्रह वाढवतात व शिष्यांकरवीही लोकसंग्रह करवितात. "महंतें महंत करावे । युक्तीबुद्धीनें भरावे । जाणते करूनी विखरावे । नाना देसीं ॥" (दास. ११-१०-२५) हे त्यांचे कार्यही ध्यानात घ्यावे एवढे महत्वाचे आहे. समर्थांना अपेक्षित "महंता"ची सर्व कार्ये ते सावधपणे करीत आले आहेत. "आता उरलो उपकारापुरता ।" अशी श्रीतुकारामांप्रमाणेच त्यांचीही स्थिती आहे. तरीही सतत अभ्यास, अध्ययन, मनन, चिंतन, लोकजागृती या गोष्टी ईश्वरकार्य आहेत ते ओळखून ते करीत आहेत. शंकराचार्य, ज्ञानदेव, तुकाराम, रामदास हे जसे त्यांना प्रिय आहेत तसेच त्यांनी फ्रॉईड, शॉपेन हॉवर, बर्कले, हिन्सबर्ग यासारख्या पाश्चात्य विज्ञाननिष्ठ तत्ववेत्त्यांच्या विचार आणि तत्वज्ञानाचा आस्थेने अभ्यास केला आहे. मन, बुद्धी या विषयांचा पाश्चात्यांचा नव्याने होणारा विचार व आपल्याकडे वेदोपनिषदांपासून झालेले विचार व निर्णय हे सारेच त्यांच्या विवेचनात कसे सहजतेने येऊन जाते. मोक्षाला अनुकूल अशा जीवनपद्धतीचा ते कळकळीने पुरस्कार करतात. आत्मचिंतन, भगवद्‌चिंतन, तत्वचिंतन, श्रीगुरूचिंतन या गोष्टींची असणारी नितांत आवश्यकता ते पटवून देत असतात.
वरील सर्व कार्याबरोबर "पत्रद्वारा दासबोध अभ्यास" ह्या महान उपक्रमाच्या सहसंयोजकाचे काम त्यांनी केले. त्यातील "प्रबोध" या तिसर्‍या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांची निर्मिती केली. श्रीसमर्थ सेवा मंडळ, सज्जनगड या संस्थेचे एक मान्यवर ट्रस्टी या नात्याने त्यांनी अनेक वर्षे काम केले. पुढे त्यांच्या हातून दासबोध चिंतनिका, आत्माराम (विवरण), दासबोध -सार्थ व सटीक, पंचदशी भावदर्शन यासारखे अनेक उत्तमोत्तम ग्रंथ निर्माण झाले. "भक्तीयोग" हे त्रैमासिक त्यांच्या परिवाराने सुरू केले आहे. त्यांतूनही त्यांचे लेखनकार्य, साधकांच्या शंकांचे निरसन इ. सुरू असते. (या त्रैमासिकांत अनेक साधक स्वतः विचार करून लिहू लागले) विषयाची मुद्देसूद मांडणी, निर्भीड व सुस्पष्ट विचार हे त्यांचे वैशिष्टय आहे. कोणत्याही ग्रंथाच्या संहितेचे तसेच आयुष्यात घडणार्‍या घटनांचे प्रत्यक्ष साधनेत रुपांतर झाले पहिजे हा आग्रह त्यांच्या प्रवचनांचे व लिखाणाचे वैशिष्ट्य आहे. त्यांचा "संसारसागरातील गीतादीपस्तंभ" हा ग्रंथ त्या दृष्टीने आदर्श आहे.
वारकरी संप्रदाय, समर्थ संप्रदाय, दत्त संप्रदाय, नाथ संप्रदाय, चिन्मय संप्रदाय इत्यादी विविध अद्वैत संप्रदायात तत्व, शिकवण व अंतिम ध्येय एकच आहे हे ते सतत सांगत असतात. संप्रदायात वरकरणी भेद दिसतो तो त्या त्या संप्रदायात प्रचलित असलेल्या साधनेच्या, उपासनेच्या भेदामुळेच असतो, असे सांगून ते मतामतांतरातील भेद दूर करण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात.

या आध्यात्मिक वैभवामुळेच उज्जैन येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांच्याकडे चालून आले. २००३ मध्ये कोल्हापूर येथील यादव मठाने त्यांना "ज्ञानभूषण" या बिरूदाने सन्मानित केले. आध्यात्मिक क्षेत्रात उत्तम ग्रंथनिर्मितीसाठी दिला जाणारा श्री. निलंगेकर पुरस्कृत "श्री मुकुंदाचार्य" हा विद्वत्‌ पुरस्कार "पंचदशी भावदर्शन" या ग्रंथाला फेब्रुवारी २००६ मध्ये औरंगाबाद येथील एकनाथ संशोधन मंदिर यांच्यातर्फे देण्यात आला. नरसिंहवाडी (नरसोबाची वाडी) संस्थानानेही त्यांचा असाच सत्कार केला आहे. यासारख्या इतरही अनेक पुरस्कार व सन्मानांनी ते मंडित आहेत. अशा रितीने ईश्वरकार्यासाठी तन-मन-धन वेचणारे डॉक्टरकाका श्रुतिस्मृतींचा आशय, त्यांतील तत्वज्ञान नुसते सांगतात असे नाही तर ते तत्वज्ञान जणू काही मूर्त रूप घेऊन त्यांच्या रुपाने आपल्यासमोर प्रकट होते - "परी श्रुतिस्मृतींचे अर्थ । जे आपण होऊनी मूर्त । अनुष्ठानें जगा देंत । वडील जे हे ॥" (ज्ञा. १७-८६) श्रोत्रीय, ब्रह्मनिष्ठ व दयाळू अशा या प्रसन्नचित्त महापुरुषाचे दर्शन घेणारे, त्यांचे प्रबोधन ऐकणारे व त्यांच्या अनुग्रह लाभलेले असे सर्वच धन्य होत.

 

त्यांचे कार्य थोडक्यात -
* शुद्ध परमार्थ लोकांपर्यंत नेणे.
* वेदान्तशास्त्र सांगणार्‍या ग्रंथांची निर्मिती करणे, तसेच नियतकालिकांमधून परमार्थपर लेख लिहिणे.
* परमार्थाविषयी जनमानसांत रूढ असलेल्या गैरसमजुती दूर करणे.
* शुद्ध परमार्थ, परमार्थ शास्त्र, संतविचार व साधना सर्वांपर्यंत नेऊ शकणारे अनेक प्रवचनकार व लेखक तयार करणे.
* मुमुक्षूंना त्याच्या ध्येयाप्रत नेणे व सर्वच साधकांना प्रगतीचा मार्ग दाखवणे.
* विविध अद्वैत संप्रदायांतील वरकरणी दिसणारा भेद व त्यांमुळे निर्माण झालेला भेदभाव दूर करणे.
* स्वतः आचरून इतरांना साधना, वैराग्य, अनासक्ती यांचा धडा घालून देणे.

* तीसपेक्षा अधिक वेदांतप्रचुर ग्रंथांची निर्मिती.
* विविध ठिकाणी दिलेली बारा हजारच्या वर प्रवचने.
* जगभर विखुरलेल्या साधकांना मार्गदर्शनाच्या निमित्ताने भारतभर व परदेशात केलेला प्रचंड प्रवास.
* जीवन विकार, सज्जनगड, प्रसाद, भक्तियोग, पंढरीसंदेश इत्यादी नियतकालिकांतून केलेले विपुल लेखन.
* अगणित पुरस्कार आणि सन्मानपत्रे.

***